छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मराठवाड्यात २०२५ मध्ये तब्बल ११२९ शेतकर्यांनी आपले जीवन संपवले. शेतकरी आत्महत्यांचे हे सत्र नव्या वर्षातही सुरूच आहे. जानेवारी २०२६ या एका महिन्यात विभागात ७६ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सर्वाधिक २४ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही २० शेतकर्यांनी आपले जीवन संपविले आहे.
मराठवाड्यातील बहुतेक शेती ही कोरडवाहू स्वरुपाची आहे. मागील काही वर्षांत कधी पावसाचा खंड तर कधी अतिवृष्टी यामुळे शेती पिकांचे नुक्सान होऊन त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. शिवाय पिकविलेल्या शेतीमालाला हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्यानेही शेतकरी अडचणीत आला आहे. परिणामी, शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवित आहेत. सन २०२५ मध्ये म्हणजे १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या दरम्यान मराठवाड्यातील ११२९ शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यानंतर २०२६ मध्येही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. जानेवारी महिन्यात आणखी ७६ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या वारसांना शासनाकडून १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.












